पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने वार; कोल्हापूरात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी अटकेत
योगेश पांडे – वार्ताहर
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात सोमवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रशांत पाटील या नराधम पतीने पत्नी रोहिणी पाटील (२८) हिच्या डोळ्यात चटणी टाकून, कोयत्याने गळ्यावर सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली. आरोपी प्रशांतला रात्री उशिरा कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी ही गेल्या आठवड्याभरापासून माहेर ढवळी येथे वडील आजारी असल्याने पतीसमवेत ये-जा करत होती. सोमवारी सायंकाळी दोघे मोटारसायकलने भादोलेला परत येत असताना रात्री साडेआठच्या सुमारास झुंजीनाना मळ्याजवळ हा प्रकार घडला. प्रशांतने अचानक पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून घटनास्थळीच तिचा जीव घेतला.
हत्या करून तो थेट गावात परतला आणि गावकऱ्यांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर “मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता पाच-सहा महिने येणार नाही” असे सांगून तो पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, पळून गेलेल्या प्रशांत पाटीलला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडामुळे भादोलेसह परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास वडगाव पोलिस करत आहेत.