मुलांकडून चिकन लॉलीपॉपचा हट्ट; आईने केली मुलाची हत्या, मुलगी गंभीर जखमी.

Spread the love

मुलांकडून चिकन लॉलीपॉपचा हट्ट; आईने केली मुलाची हत्या, मुलगी गंभीर जखमी.

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – पालघर तालुक्यातील धनसार काशिपाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरात्रौत्सवात चिकन लॉलीपॉप मागितल्याच्या कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सात वर्षीय चिन्मय गणेश घुमडे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत बालकाची आई पल्लवी घुमडे (४०) हिला पोलिसांनी अटक केली आहे. पल्लवी आणि तिचा पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदर येथे राहत होते. गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली. ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती. महिलेचे नवरात्रौत्सवाचे उपवास सुरू होते.त्यातच मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला. यातून संतापलेल्या महिलेने मुलांना लाटण्याने खूप मारहाण केली. यातच एका मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, मुलं हट्ट केल्यावर आई-वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दोन्ही मुलांनी चिकन आणून देण्याची मागणी केली. मात्र, या किरकोळ कारणावरून संतापलेल्या पल्लवीने स्वयंपाकघरातील लाटण उचलून मुलांना मारहाण केली. यात सात वर्षीय चिन्मयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. ही घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली. सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. एका आईच्या हातून घडलेल्या या निर्दयी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon