कोटला गावात तणाव; धर्मगुरुची विटंबना प्रकरणी एक ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर : कोटला गावात सोमवारी सकाळी अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. अज्ञात व्यक्तीने मुस्लिम धर्मगुरुचं नाव रस्त्यावर लिहून विटंबना केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. या प्रकाराचा निषेध करत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आणि रास्ता रोकोचा प्रयत्न झाला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
घटनेनंतर तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आंदोलकांनी रस्ता आणि महामार्ग अडविल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या प्रकारानंतर पोलीस अधिकारी माईकवरून नागरिकांना शांततेचे आवाहन करत होते. “कायदा हातात घेऊ नका, शांततेत निघून जा. अन्यथा पोलिसांना कारवाई करावी लागेल,” असा इशाराही देण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप म्हणाले, “पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. विनाकारण रास्ता रोको करणं चुकीचं आहे. पोलिसांवर हल्ला करणं हा गंभीर प्रकार आहे. लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवले पाहिजेत.”
दरम्यान, पोलिसांनीही स्पष्ट केलं की काही समाजकंटकांनी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोटला गावात तणाव निर्माण झाल्यानंतरही सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाखाली असून, वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.