मालमत्ता गुन्हे कक्षाची धडाकेबाज कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईतून ॲपलसह सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, पाच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अलीकडच्या काळात शहरात वाढलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मालमत्ता गुन्हे कक्षाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींनी विविध भागात मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पुढील तपासादरम्यान आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मोबाईल स्नॅचिंग टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.