मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; चार दिवसांत सात विनयभंगाच्या घटना
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : ‘महानगरीची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान तब्बल सात विनयभंगाच्या घटना घडल्या असून, गर्दीच्या लोकलपासून रेल्वे स्थानकांपर्यंत महिलांसाठीचा प्रवास केवळ त्रासदायक नाही, तर धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी किमान २० टक्क्यांहून अधिक प्रवासी महिला असतात. तरीही, महिलांसाठी स्वच्छतागृहे, आसनव्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यातच गेल्या चार दिवसांत सात विनयभंगाच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.
पनवेल, वाशी, बोरिवली स्थानक परिसरात तसेच धावत्या लोकलमध्ये महिलांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. तीन घटना स्थानक परिसरात, तर चार घटना लोकलमधून घडल्या. बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यातील दोन प्रकरणे वगळता, उर्वरित घटनांमध्ये आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. मात्र, बोरिवलीतील आरोपी अजूनही फरार आहेत.
घटनांमध्ये कोपरखैरणे व नालासोपारा स्थानक परिसर, विरार लोकलचा सामान्य डबा, पनवेल-ठाणे लोकलचा तिसरा डबा, बोरिवली व पनवेल स्थानक तसेच दहिसर–मिरा रोडदरम्यानच्या लोकलमध्ये महिलांना छेडछाड आणि हल्ल्यांचा सामना करावा लागला.
दरम्यान, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेली हेल्पलाइन आयव्हीआरएस प्रणालीवर चालते. त्यामध्ये थेट अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याआधी ‘एक दाबा, दोन दाबा’ अशा सूचनांमुळे वेळेचा अपव्यय होतो. तातडीने मदत मिळत नसल्यामुळे महिला प्रवासी त्रस्त आहेत. “हेल्पलाइनमध्ये थेट संपर्काची सोय करून, आरोपींना घटनास्थळीच पकडून कारवाई व्हावी,” अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी केली.
रेल्वे पोलिसांनी मात्र, “महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत,” असे स्पष्टीकरण दिले आहे. पण वाढत्या घटनांमुळे महिलांचा असुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.