वसईत गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने महिलेचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – नवरात्रोत्सवाच्या जल्लोषात वसईत एक हृदयद्रावक घटना घडली. गरबा खेळून झाल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. फाल्गुनी राजेश शहा असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्थानिक रहिवासी फाल्गुनी शहा उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मात्र, गरबा खेळून झाल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्या जमिनीवर कोसळल्या.
तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या योग्यम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अधिक उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, दरम्यानच त्यांचे निधन झाले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. नवरात्रोत्सवातील आनंदमयी वातावरणात घडलेली ही घटना सर्वांनाच चटका लावणारी ठरली आहे.