गायमुख रस्ता रुंदीकरण, पर्यटन-विकास, कृषी प्रकल्पांना चालना – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी, पर्यटन, कृषी आणि सार्वजनिक सोयींशी संबंधित अनेक प्रकल्प गतीमान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.
गायमुख घाटातील रस्त्याची दुरुस्ती सुरू असून वसई तालुक्यात अवजड वाहनांना थांबविण्यासाठी पर्याय शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळ-संध्याकाळी अवजड वाहतूक बंद ठेवल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर गायमुखाचा रस्ता ६० फुटी करण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे.
पर्यटन विकास
ठाणे जिल्ह्यातील ३९ पर्यटनस्थळांचा विकास सुरू असून येऊर, माहुली गड, माळशेज घाट, काळू नदी बॅक वॉटर, तानसा, अंबरनाथ आणि मलंगगड ट्रॉलीसाठी निधी मंजूर झाल्याचे डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले. मलंगगड फ्युनिकल ट्रॉलीचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून ते लवकर सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी केली जाणार आहे.
कृषी व अभिनव उपक्रम
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषीवरील प्रोसेसिंग प्रकल्प, सुरण लागवड, तसेच शाळांचे सक्षमीकरण, रस्ते सुरक्षा समितीचे प्रभावी काम आणि जमिनीची डाटा बँक तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
पर्यावरण व कायदा अंमलबजावणी
खारफुटीचे संरक्षण, सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच खड्डेमुक्त ठाण्यासाठी खासगी संस्थांची नेमणूक केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ५० दिवसांनी पत्रकार परिषदेत डॉ. पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील विकास आराखड्याची दिशा स्पष्ट केली.