अकोल्यात ६० लाखांचा शेअर घोटाळा उघड; महिला आरोपी इंदौरमध्ये जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला : डिजिटल गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून तब्बल ₹६०,३८,२००/- रुपयांचा शेअर ट्रेडिंग घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्यातील डॉ. राहुल सुरूशे यांना शेअर मार्केटमधून भरघोस नफा मिळेल असा खोटा सापळा लावून रक्कम लुबाडण्यात आली. परंतु सायबर पोलिसांच्या दक्ष तपासामुळे आरोपी महिला इंदौर येथे जेरबंद झाली.
अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असा विश्वास डॉ. सुरूशे यांना दिला. त्यानुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने ६० लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. मात्र नफा देण्याऐवजी आणखी पैसे मागण्याचा प्रकार सुरू झाल्याने फसवणुकीचा उलगडा झाला.
खदान पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८(४) व आयटी अॅक्ट ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. डिजिटल खुणांचा माग काढत अकोला सायबर पोलिसांनी इंदौर पोलिसांच्या मदतीने १९ सप्टेंबर रोजी आरोपी तनवीर शहादाब समीर कौसद (वय ४६, रा. इंदौर) हिला अटक केली. न्यायालयाने तिला २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडीची परवानगी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दीपक कोळी, सपोनि. मनिषा तायडे व त्यांच्या पथकाने केली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषांवर कधीही विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यवहार दिसताच त्वरित सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधावा.