भिवंडीत एटीएसची धडक कारवाई; फिलिस्तीनला निधी पाठवल्याप्रकरणी तिघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा भिवंडीतील विविध भागांत छापेमारी करत तिघा तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे ३ लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीनला पाठवल्याचा आरोप आहे. याशिवाय या तिघांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२), अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२) आणि जैद नोटियार अब्दुल कादिर (२२) अशी आहेत.
२७ ऑगस्ट रोजीच्या तपासादरम्यान यूपी एटीएसला भिवंडीमार्गे मोठ्या प्रमाणावर परदेशात निधी पाठवला जात असल्याचे समजले. त्यानंतर शुक्रवारी एटीएसचे पथक भिवंडीत दाखल झाले. सतत पाळत ठेवल्यानंतर शनिवारी गुलजार नगर येथून अबू सुफियानला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर निजामपूरा व शांतीनगर भागातून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या तिघांवर दहशतवाद्यांना अर्थसाहाय्य करण्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी त्यांना लखनौ येथील एटीएस मुख्यालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
अलिकडच्या काही वर्षांत भिवंडी परिसरातून दहशतवादी व देशविघातक कारवायांशी संबंधित अनेक कारवाया उघड झाल्या आहेत. नुकताच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरातून आफताब कुरेशी नावाच्या संशयिताला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वीही पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना भिवंडीतून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच पडघा परिसरातून इसिसशी संबंधित दहशतवाद्यांची धरपकड झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
भिवंडीतील अशा सलग कारवायांमुळे ठाणे जिल्हा व मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.