चेंबूरमध्ये भाजपचे थाळीनाद धरणे आंदोलन – रस्ते, पाणी व फेरीवाल्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले
रवि निषाद/मुंबई
मुंबई – चेंबूर परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत महानगरपालिका एम/पश्चिम विभाग कार्यालयावर भाजपच्या वतीने थाळीनाद धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक महादेव शिवगण, माजी नगरसेविका सुषम सावंत, माजी नगरसेवक राजेश फुलवारिया आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. आशा मराठे यांनी केले.
या आंदोलनादरम्यान प्रमुख मागण्या पुढे मांडण्यात आल्या. त्यामध्ये –
चेंबूर परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करणे,
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून फेरीवाला मुक्त चेंबूर घोषित करणे,
वार्ड क्र. १५२ मधील स्वस्तिक पार्क, मकवाना सोसायटी, अंजिक्यतारा सोसायटी, सिध्दार्थ कॉलनी – समता शुद्धोधन नगर, सुभाष नगर या भागांतील गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या दूर करणे,
तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या पाईप लाईनचे तातडीने नूतनीकरण करणे या मुद्द्यांचा समावेश होता.
आंदोलनावेळी शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त श्री. शंकर भोसले यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर २३ सप्टेंबर २०२५ रोजी विस्तारित बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. या थाळीनाद धरणे आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान परिसरात घोषणाबाजी करत नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.