सराईत वाहनचोर करण आढाव जेरबंद; ७ गुन्ह्यांचा छडा, २.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे यांच्या कौशल्यपूर्ण तपासातून सराईत वाहनचोर करण बाळु आढाव (वय २४, रा. जयभिम नगर, झोपडपट्टी, कळवा पश्चिम) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येत २,८५,०००/- रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी खारेगाव परिसरातून एका ऑटो रिक्षाची चोरी झाल्याने कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ७४८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेस तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
तपासामध्ये घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एक संशयित आरोपी दिसून आला. या आरोपीचा माग काढत माजिवाडा व घोडबंदर रोडवरील सीसीटीव्ही पडताळून करण आढाव हा संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यास १५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपी “मास्टर की” चा वापर करून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ऑटो रिक्षा व दुचाकी चालू करून चोरी करत असे. गेल्या महिनाभरात त्याने कळवा, नौपाडा, कापुरबावडी, खडकपाडा, नारपोली व गणेशपुरी (ठाणे ग्रामीण) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ ऑटो रिक्षा व ५ मोटारसायकली असा एकूण ७ वाहनांचा मुद्देमाल चोरला होता.
सदर आरोपीकडून खालील वाहने जप्त करण्यात आली आहेत –
ऑटो रिक्षा – २ (किंमत : ₹८५,०००/-)
मोटारसायकली – ५ (किंमत : ₹२,००,०००/-)
एकूण किंमत : ₹२,८५,०००/-
करण आढाव याच्यावर याआधीही कापुरबावडी व कळवा पोलीस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे सहा गुन्हे नोंद आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, उपनिरीक्षक दिपक घुगे, दयानंद नाईक, दिपक जाधव, सुनिल माने तसेच पोहवा संदीप महाडीक, प्रशांत निकुंभ, नंदकुमार पाटील, शशिकांत सावंत व पोशि सागर सुरळकर यांनी मोलाची भूमिका बजावली.