बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक शहरातील सातपूर परिसरात भरदिवसा एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, तरुणाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोबाईल फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. पीडित तरुण तेजस ज्ञानदेव घाडगे (२४)याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि काही दिवसांपूर्वीच त्याचे लग्न मधुमती नामक तरुणीशी झाले आहे. मात्र, मधुमतीचे विवाहाच्या आधी गिरीश शिंगोटे या तरुणाशी प्रेमसंबंध होते, आणि लग्नानंतर तो सातत्याने तेजस याला धमक्या देत होता.
बुधवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता तेजस आपल्या मित्रास भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील हिंद सोसायटी समोर असलेल्या चहा टपरीवर गेला असता, तेथे गिरीश शिंगोटेचा मित्र शैलेश ऊर्फ बंटी, अक्षय पवार व त्यांचे ४-५साथीदार सफेद रंगाची स्विफ्ट डिजायर (एमएच ०६ एएस ५५१७) गाडी घेऊन आले. त्यांनी तेजसला टपरीबाहेर ओढून गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले व त्याला मारहाण करत अपहरण केले. गाडी सातपूर कॉलनीकडे नेत असताना, तेजसला मारहाण करत त्याचा मोबाईलही हिसकावण्यात आला. मोबाईलचा लॉक उघडून घेण्यात आला. मात्र, प्रसंगावधान राखत तेजसने शिव हॉस्पिटलजवळून गाडीतून उडी घेतली आणि तातडीने एका रिक्षातून पपाया नर्सरी येथील ट्राफिक पोलिस चौकी गाठली. पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर अपहरणकर्ते तेथून फरार झाले. सातपूर पोलिसांनी गिरीश शिंगोटे, शैलेश कुवर उर्फ बंटी, अक्षय पवार व इतर अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकी यासंबंधी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर शूट केली असून, त्याचे फुटेज पोलिसांकडे सापडले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.