गोरेगावमध्ये धक्कादायक घटना! शाळेतील महिला कर्मचाऱ्याकडून ४ वर्षीय मुलीचा विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : महानगरातील गोरेगाव पश्चिम परिसरात एका नामांकित शाळेमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. शाळेतील महिला कर्मचाऱ्याने केवळ ४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालिकेची आजी तिला शाळेतून घरी घेऊन गेल्यानंतर कपडे बदलताना मुलीच्या शरीरावर जखमा दिसल्या. याबाबत संशय आल्याने आजीने तात्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन तिच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, नेमक्या किती दिवसांपासून बालिकेचा विनयभंग आणि छळ सुरू होता, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, शाळेच्या सुरक्षेबाबत पालकांमध्येही गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
गोरेगाव पोलिसांकडून आरोपी महिला कर्मचाऱ्याचा कसून तपास सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या प्रकरणामुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.