कल्याणमध्ये डॉक्टर आणि फार्मासिस्टसोबत ७० लाखांची फसवणूक; डॉक्टर दाम्पत्य फरार
कल्याण – कल्याणमध्ये पन्नास खाटांचे रुग्णालय सुरू करून मेडिकल स्टोअर देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टर आणि फार्मासिस्टकडून तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कल्याण खडकपाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
कशी केली फसवणूक?
मे २०२४ मध्ये ठाण्यातील हिरानंदानी स्टेट येथील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली प्रसाद साळी यांनी कल्याण आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. याच रुग्णालयात मेडिकल स्टोअर देण्याचे आमिष दाखवून त्यांनी डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा सौरभ कांबळे यांच्याकडून तब्बल ७० लाख रुपये स्वीकारले. डॉ. प्रसाद यांनी तीन महिन्यांत रुग्णालय सुरू करण्याचा करार केला होता. मात्र, वर्ष उलटूनही रुग्णालय सुरू झाले नाही आणि पैसेही परत केले गेले नाहीत.
पीडित डॉ. राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी पोलिसांना सांगितले की, रुग्णालय सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक असल्याचे सांगून आरोपींनी जवळपास ८० लाख रुपये मागणी केली होती. मात्र, त्यांनी ७० लाख रुपये चेकद्वारे दिले. या फसवणुकीत इतर काही डॉक्टर, फार्मासिस्ट किंवा पॅथॉलॉजी प्रयोगशाळा संचालक यांचाही सहभाग असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.
करार करूनही आरोपींनी पैसे परत न देता उलट टाळाटाळ केली. परिणामी, प्रज्ञा कांबळे आणि डॉ. राहुल दुबे यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणात डॉ. प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साळी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून या दाम्पत्याचा शोध घेतला जात असून, तपासादरम्यान आणखी काही बळी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.