भिवंडीत गॅरेजमधील दुचाकी चोरणारा शिताफीने गजाआड; शांतीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – शहरातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गजाआड केले आहे. पोलिसांनी या आरोपीकडून तब्बल ₹१,००,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या वाहनांवर लक्ष ठेवून त्यांची चोरी करून पसार होत असे. या चोरीच्या घटनांची दखल घेत शांतीनगर पोलिसांनी गुप्त पथक तैनात केले. तपासात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली दुचाकी वाहने जप्त केली.
शांतीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, गॅरेजधारकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत. पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.