विनातिकीट रेल्वेत प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई; मध्य रेल्वेने ५ महिन्यात तब्बल ११.४४ कोटी केले वसूल
योगेश पांडे / वार्ताहर
नागपुर – भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. कमी वेळात आपल्याला हव्या ते ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय अतिशय कमी खर्चात रेल्वे प्रवास करता येतो. तसेच आपल्याला हवं तसं तिकीट बुक करता येतं. प्रवाशांना एसी, नॉन एसी डब्ब्यांसाठी तिकीट बुक करता येतं. तसेच फर्स्ट क्लास सुविधा हव्या असल्यास तशाही मिळवता येतात. पण अनेकदा जनरल डब्ब्यांमध्ये आणि स्लिपर कोचमध्ये तिकीट न काढताच अनेक प्रवासी प्रवास करतात. असं करणं हे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. याशिवाय जे तिकीट काढून रेल्वे प्रवास करतात अशा प्रवाशांसाठी हा अन्याय आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केली. या कारवाईत मध्य रेल्वेला तब्बल ११.१४ कोटी रुपये मिळाले आहेत. लोकांना चांगला आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या विविध रेल्वे विभागात अनधिकृत आणि फुकट्या प्रवाशांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. यात आता मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील डेटा जारी केला असून, या कालावधीत मध्य रेल्वेच्या विविध तिकीट तपासणी पथकांनी नागपूर विभागातून १.८५ लाख फुकट्या प्रवाशांना अवैध प्रवास करताना पकडले आहे. या प्रवाशांना आकारण्यात आलेल्या दंडाच्या माध्यमातून मध्य रेल्वेने ११.४४ कोटी रुपयेइतका दंड वसूल केला असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
मध्य रेल्वेने हे विशेष तिकीट तपासणी अभियान आपल्या सर्व विभागांमध्ये अधिक प्रभावीपणे राबविले आहे. नागपूर, मुंबई आणि पुण्यासह इतर विभागातील मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, विशेष गाड्या आणि उपनगरीय गाड्यांमध्ये अशा मोहिमा राबवण्यात आल्या. विनातिकीट प्रवासावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर विभागाने स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, सघन तपासणी आणि विशेष छापे टाकलेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्ये रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई फुकट्या प्रवाशांच्या संख्येत आघाडीवर आहे. मुंबई विभागात एकूण ७.०३ लाख फुकट्या प्रवाशांकडून २९.१७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भुसावळ विभागात ४.३४ लाख फुकट्या प्रवाशांकडून ३६.९३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर विभागात १.८५ लाख फुकट्या प्रवाशांकडून ११.४४ कोटी रुपये तर, पुणे विभागात १.८९ लाख फुकट्या प्रवाशांकडून १०.४१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोलापूर विभागात १.४ लाख फुकट्या प्रवाशांकडून ५.१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.