नर्तकीच्या प्रेमप्रकरणातून माजी उपसरपंचाची आत्महत्या; बिडमध्ये खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ३५) यांनी एका नर्तकीच्या प्रेमसंबंधातून नैराश्येत जाऊन डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्गे यांची दीड वर्षांपूर्वी पूजा गायकवाड (वय २१, रा. बार्शी) या कला केंद्रातील नर्तकीशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. नर्तकी पूजा सोशल मीडियावर सतत तिच्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करायची. या नात्यात बर्गे यांनी तिला जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजाने बर्गेंशी संवाद थांबवला होता. त्यातच तिने बर्गेंना “गेवराईतील तुमचा बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा” अशी मागणी केली होती. या मागण्यांमुळे बर्गे अधिकच मानसिक तणावाखाली गेले होते.
सोमवारी रात्री ते पूजाच्या घरी गेले होते. मात्र, तिथे अपेक्षित बोलणी न झाल्याने त्यांनी तिच्या घरासमोर उभी असलेल्या स्वतःच्या कारमध्येच कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह मंगळवारी बार्शी तालुक्यात आढळून आला. या घटनेनंतर गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, नर्तकी पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने ‘पिंजरा’ चित्रपटातील कथानकाची आठवण अनेकांना झाली आहे. जसे चित्रपटात एका गावातील नेत्याचे जीवन एका नर्तकीच्या प्रभावाखाली उद्ध्वस्त होतं, तसाच वास्तवातील हा प्रकार असून बीड जिल्ह्यात या आत्महत्येची सर्वत्र चर्चा रंगली आहे.