विमानातून प्रवास करत आलिशान हॉटेल्समध्ये राहुन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात पोलिसांना यश

Spread the love

विमानातून प्रवास करत आलिशान हॉटेल्समध्ये राहुन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात पोलिसांना यश

योगेश पांडे / वार्ताहर 

छत्रपती संभाजीनगर – राज्यभरात विमानाने प्रवास करून आलिशान हॉटेलमध्ये निवासाला थांबत घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी चिकलठाणा येथील घरफोडीमध्ये अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मिस्त्री राजभर (३८) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. चिकलठाणा येथे आकाश देऊळगावकर यांच्या घराची कडी तोडून आरोपीने नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तपासामध्ये पोलिसांना आरोपी निष्पन्न होत नव्हता. यामुळे आकाश देऊळगावकर यांच्या कुटुंबीयांनी आता सोने परत मिळेल याची अपेक्षाच सोडून दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार तपास अधिकारी बदलले. अखेर एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाला होता. सीसीटीव्हीतील आरोपी हा अनिल राजवर असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. मात्र त्याचा शोध घेऊनही त्याचा पत्ता लागत नव्हता.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले. उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला तपासासाठी पाठवले. कुख्यात आरोपी अनिल राजवर याला सोलापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती उपनिरीक्षक वाघ यांना मिळाली. उपनिरीक्षक वाघ यांनी तात्काळ पथकाला घेऊन सोलापूर गाठले. याच वेळी आरोपीला जामीन मंजूर झाला. मात्र कागदपत्रांची प्रक्रिया झाली नव्हती. याच वेळी पोलिसांनी अनिल राजभर याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई अमलदार सुनील जाधव,सोमकांत भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके, नवनाथ खांडेकर यांनी केली. दरम्यान, अनिल याने आकाश देऊळगावकर यांचा चोरी केलेला सोनं मुंबई येथील साकीनाका रोडवरील रोनक योगेश सिंघवी ललित बाबूलाल सिंघवी या व्यावसायिकांना विकलं होतं. पोलिसांनी व्यवसायिकांना नोटीस देऊन देखील ते उत्तर देत नव्हते. अखेर पोलिसांनी दुकानदारांनाच सहआरोपी करून बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांनी नऊ तोळ्यांची खरेदी केल्याचं कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon