येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी : झोपण्याच्या वादातून कैद्याला खिळ्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. झोपण्यासाठी जागा मिळावी या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कैद्याला खिळ्याने मारहाण करण्यात आली. या घटनेत कैद्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मारहाण झालेल्या कैद्याचे नाव संजय भिकाजी कापडे (वय ५२) असे असून, आरोपी कैद्यांची नावे भरत विशाल राठोड आणि मोहम्मद गुलाब शेख अशी आहेत. या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कारागृहातील वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत राठोड आणि मोहम्मद शेख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. अद्याप त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. तर संजय कापडे यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली असून ते शिक्षा भोगत आहेत.
घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता घडली. बराकीत झोपण्याच्या कारणावरून कापडे, राठोड आणि शेख यांच्यात वाद झाला. वाद चिघळताच भरत राठोड व मोहम्मद शेख यांनी खिळ्याने कापडे यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या छातीवर ठोसे मारून त्यांना जखमी केले.
घटनास्थळी इतर कैद्यांमध्ये गोंधळ उडाल्यानंतर कारागृह रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून मारहाण थांबवली. कापडे यांना कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी येरवडा कारागृहाला भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहेत.
येरवडा कारागृह हे राज्यातील एक महत्त्वाचे आणि उच्च सुरक्षा कारागृह मानले जाते. तरीदेखील येथे वारंवार कैद्यांमध्ये हाणामारी, मोबाईल वापर, अगदी पळून जाण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे यापूर्वीच कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तरीदेखील अशा घटनांचा पुनरुच्चार होणे हे कारागृह प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या घटनेमुळे येरवडा कारागृहातील शिस्तभंगाच्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.