जळगावात सावकारीचा मोठा घोटाळा; तीन कोटींची जमीन अवघ्या ३० लाखांत लुबाडली!
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्याचा गैरफायदा घेत तीन कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३० लाखांत बळकावल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. जिल्हा सहकार उपनिबंधकांच्या छाप्यात हा प्रकार समोर आला असून, संबंधित सावकाराविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. जळगाव येथील व्यापारी राजकुमार नारायण पाटील यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यावेळी त्यांनी मनोज लीलाधर वाणी आणि त्यांच्या पत्नींकडून ३० लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, व्याजाने कर्ज देताना वाणी यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली तीन कोटींची जमीन आपल्या नावे खरेदीखत करून घेतली. हा व्यवहार २०२१ मध्ये झाला होता. कर्ज रकमेपैकी वाणी यांनी पाटील यांना २६ लाख रुपयांचा धनादेश आणि चार लाख रुपये रोख दिले होते. त्याबदल्यात जमीन हस्तांतरित करण्याचा करार करण्यात आला. यावेळी अनेक साक्षीदार उपस्थित होते. पाटील यांनी वेळेत कर्जाची रक्कम व्याजासह परत केली. ठरल्याप्रमाणे जमीन त्यांच्या नावावर परत केली जाणे अपेक्षित होते. मात्र, वाणी यांनी जमीन परत करण्यास नकार दिला. त्यानंतर पाटील यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे अवैध सावकारीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सहकार विभागाने वाणी यांच्या घरावर छापा टाकला. त्यात नऊ खरेदीखत आणि तीन सौदा पावत्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक चौकशीत आणखी अवैध सावकारीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अवैध सावकारीमुळे नाशिकसह राज्यभर गंभीर प्रकार घडले आहेत. नाशिकमध्ये सावकारीतून अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आत्महत्येसारख्या घटना समोर आल्या होत्या. आता जळगावमध्येही जमीन बळकावण्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व सावकारी व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. “वाणी यांच्या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल,” असे जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांनी स्पष्ट केले.