पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी कारवाई : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वैरातून झालेल्या आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. बुलढाणा येथे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी मध्यरात्री उशिरा सापळा रचून ही कारवाई केली. अटक झालेल्यांमध्ये बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ५ सप्टेंबर रोजी रात्री नाना पेठेतील सोसायटीच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकर (गणेश कोमकरचा मुलगा) याच्यावर आंदेकर टोळीने गोळ्या झाडून खून केला होता. हा हल्ला अमन पठाण आणि यश पाटील यांनी केला होता. आयुषचा मृत्यू होताच पुणे शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याच्या चर्चांना उधाण आले.
आयुष हत्येप्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (६०), कृष्णराज आंदेकर (४१), शिवम उर्फ शुभम आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०), वृंदावनी वाडेकर (४०), तुषार वाडेकर (२६), स्वराज वाडेकर (२२), अमन पठाण, सुजल मेरगु (२३), यश पाटील आणि अमित पाटोळे (१९) यांचा समावेश आहे. या प्रकरणी सुरुवातीला प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक झाली होती. त्यानंतर आता सहा जणांना ताब्यात घेतल्याने तपासात मोठी प्रगती झाली आहे.
मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी वनराजची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ जणांना अटक झाली होती. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुष कोमकरवर हल्ला करण्यात आल्याची पोलिसांची माहिती आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींवर आज न्यायालयात हजेरी लावण्यात येणार आहे. या अटकेनंतर पुण्यातील आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शहरात सुरक्षा वाढवली आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे आयुष कोमकर हत्याकांडातील तपासाला निर्णायक वळण लागले आहे.