लालबागच्या राजाचे विसर्जन चंद्रग्रहणात; भाविकांचा संताप उसळला, मच्छीमार संघटनेची फौजदारी गुन्ह्यांची मागणी!
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबईकरांच्या मनातील आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी यंदा अभूतपूर्व गोंधळ उडाला. तब्बल ३३ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी रात्री ९.१० वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन पार पडले. मात्र, त्यावेळी चंद्रग्रहण लागल्याने लाखो गणेशभक्तांची भावना दुखावली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने संताप व्यक्त केला असून, मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
मच्छीमार संघटनेचा आरोप
समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले की, लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळा परंपरेने कोळी बांधवच करत आले आहेत. मात्र यंदा आधुनिक तंत्रज्ञान वापरून विसर्जन करण्याचा अयशस्वी प्रयोग झाला आणि विसर्जनाला उशीर झाला. परिणामी, चंद्रग्रहणाच्या काळात विसर्जन करावे लागले. हा केवळ गणपतीचा अपमान नसून सर्व गणेशभक्तांचा अपमान आहे, असे तांडेल यांनी स्पष्ट केले.
तसेच, लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये कोळी समाजातील मासेविक्रेत्या महिलांनी केली होती. पण नंतर कार्यकारिणीने उत्सवाचे बाजारीकरण सुरू केले आणि सामान्य भाविकांचा छळ सुरू झाला, असा गंभीर आरोप समितीने केला.
भाविकांचा छळ व व्हीआयपी संस्कृतीवर टीका
विसर्जनाच्या दिवशी भाविकांना तासन्तास वाट पाहायला लावण्यात आले. व्हीआयपी संस्कृतीमुळे सामान्य भक्तांना दर्शनात अडथळा आला, अशीही टीका समितीने केली.
> “गणपती कोणाच्या मालकीचा नाही. सामान्य भक्तांच्या भावनांचा विचार न करता कार्यकारिणी मंडळ फक्त पैशासाठी काम करत आहे,” अशी खोचक टीका तांडेल यांनी केली.
समितीच्या मागण्या
विसर्जन प्रक्रियेची सखोल चौकशी करून कार्यकारिणी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
लालबागच्या राजाच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून व्हीआयपी संस्कृती बंद करावी.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी देखाव्याचे पंडाल मोकळ्या जागेत तयार करावेत.
कोळी समाजाला दरवर्षी विसर्जनाचा मान मिळावा.
दर्शनाचा एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवावा.
भाविकांत नाराजीचा सूर
लालबागच्या राजाच्या विसर्जनात झालेला उशीर आणि ग्रहणकाळात झालेले विसर्जन या दोन्ही गोष्टींमुळे भाविकांत तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक भक्तांनी सोशल मीडियावर मंडळाच्या कारभारावर टीका केली आहे. या वादळानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.