डोंबिवली पोलिसांची मोठी कामगिरी; चैन स्नॅचिंग करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून सोन्याचे दागिने, चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ठाणे, पुणे आणि उत्तर प्रदेशातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास ठाकुर्ली (पूर्व) येथील चामुंडा सोसायटी गेट, ९० फूट रोड परिसरात वृद्ध महिला पायी जात असताना दोन इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पसार झाले. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८१/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात उघड झालेली माहिती
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील आणि इतर ठिकाणचे तब्बल १०६ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींनी वापरलेली मोटारसायकल क्रमांक MH-20-FR-1851 ही असल्याचे निष्पन्न झाले. मात्र चौकशीत ही मोटारसायकल पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे आढळले. दरम्यान, तपास पथकाला माहिती मिळाली की आरोपी डोंबिवलीतील सुनिलनगर येथे येणार आहेत. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे
१. अभय सुनिल गुप्ता (२१) रा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश
२. अभिषेक ओमप्रकाश जौहरी (३२) रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश
३. अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला (२७) रा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश
त्यांच्याकडे अंगझडतीदरम्यान गावठी रिव्हॉल्व्हर, ४ जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने मिळाले. हे दागिने डोंबिवली व मानपाडा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उघड झालेले गुन्हे
या टोळीच्या अटकेनंतर पुढील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे –
डोंबिवली पोलिस ठाणे : सोन्याची चैन चोरी (४.१४ ग्रॅम)
मानपाडा पोलिस ठाणे : सोन्याचे मंगळसूत्र चोरी (२३.८९ ग्रॅम)
विश्रामबाग पो.स्टे. पुणे : चोरीस गेलेली यामाहा एफझेड मोटारसायकल
बिबवेवाडी पो.स्टे. पुणे : चैन स्नॅचिंग
हडपसर पो.स्टे. पुणे : २ वेगवेगळे गुन्हे
उत्तर प्रदेशात : खून (कलम ३०२), दरोडा, फसवणूक, शस्त्र बाळगणे यासह अनेक गुन्हे.
विशेष म्हणजे, आरोपी अभिषेक जौहरी याच्यावर उत्तर प्रदेशात शस्त्र बाळगणे, दरोडा, फसवणूक यासंबंधी अनेक गुन्हे दाखल आहेत, तर अर्पित शुक्ला याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पो.नि. विक्रम गौड, पो.नि. (गुन्हे) राजेंद्र खेडकर, सपोनि अच्युत मुपडे, पो.उ.नि. प्रसाद चव्हाण व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व जवान यांनी महत्वाची भूमिका बजावली. सध्या आरोपींना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास पो.उ.नि. प्रसाद चव्हाण करीत आहेत.