अंबरनाथमध्ये हृदयद्रावक घटना : मानसिक तणावातून आईने तीन वर्षीय चिमुकलीसह घेतला गळफास

Spread the love

अंबरनाथमध्ये हृदयद्रावक घटना : मानसिक तणावातून आईने तीन वर्षीय चिमुकलीसह घेतला गळफास

पोलीस महानगर नेटवर्क 

अंबरनाथ – शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरात घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मानसिक तणाव आणि खोल नैराश्याच्या झटक्यात एका २६ वर्षीय आईने आपल्या तीन वर्षीय निरागस चिमुकलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरातील नागरिक स्तब्ध झाले आहेत. मृत आईचे नाव राजकुमारी अच्छेलाल राजस्वरूप निशाद (वय २६) असून, तिने आपल्या मुलगी अनुष्का (वय ३) हिच्यासह जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वीच राजकुमारीच्या माहेरी दुर्दैवी घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील तिच्या लहान बहिणीच्या आठ वर्षीय मुलाचा आजारपणाने मृत्यू झाला होता. या घटनेचा तिला जबर मानसिक धक्का बसला होता. पुतण्याच्या मृत्यूचे दुःख ती सतत मनात साठवून बसली होती. त्यामुळे ती वारंवार उदास राहत होती, असे नातेवाईक सांगतात.

पती अच्छेलाल यांनी पत्नीच्या खचलेल्या अवस्थेवरून तिला काही दिवस माहेरी जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, राजकुमारीने तो सल्ला नाकारला. दरम्यान, शुक्रवारी रात्री अच्छेलाल हे नेहमीप्रमाणे कामानिमित्त आनंदनगर एमआयडीसी येथील कंपनीत गेले होते. शनिवारी सकाळी ते परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. बराच वेळ ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. शिवाजी नगर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पत्र्याच्या लोखंडी अंगलला दोरी बांधून राजकुमारीने प्रथम आपल्या तीन वर्षीय चिमुकलीस गळफास दिला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य सर्वांच्या नजरेस पडले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेत मुलगी अनुष्काच्या मृत्यूबाबत आई राजकुमारीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर राजकुमारीच्या आत्महत्येबाबत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण श्रीकृष्ण नगर परिसर हळहळला असून, “अशी काय वेळ आली की एका आईने निरागस लेकरासह असे टोकाचे पाऊल उचलले?” असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon