“चक्क मंत्रालयात बनावट आयकार्डवर प्रवेश – लाखोंनी गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!”
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्राचे हृदयस्थान मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच फसवणुकीचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयात बनावट आयकार्डच्या आधारे सहज प्रवेश करून आरोपींनी कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरीसाठी बनावट मुलाखती घेऊन लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
घटना कशी उघडकीस आली?
नागपूरमधील सुगतनगर येथील राहुल तायडे हे बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या परिचयातील लॉरेन्स हेनरी (४५) याने “मंत्रालयात कनिष्ठ लिपिक पद मिळवून देतो” असे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल ₹९ लाख ५५ हजार रुपये घेतले. हे पैसे घेतल्यानंतर तायडे यांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर चक्क मंत्रालयात एका कॅबिनवर “शिल्पा उदापुरे” असे नावाचे बोर्ड लावून तिथे तायडे यांची औपचारिक मुलाखत घेण्यात आली. एवढेच नव्हे, तर आरोपींनी बनावट आयकार्ड तयार करून दिले, ज्यावरून मंत्रालयात सहज प्रवेश मिळत होता. मात्र, पैसे दिल्यानंतरही नियुक्तीपत्र न मिळाल्याने आणि वर्षानुवर्षे थांबल्यानंतर तायडे यांनी पोलिसांत धाव घेतली.
आरोपींची नावे
या फसवणूक रॅकेटमध्ये तब्बल सात जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपी :
लॉरेन्स हेनरी (४५), रा. म्हाळगीनगर
फरार आरोपी :
शिल्पा उदापुरे (४०)
वसंतकुमार ऊर्फ वसंतराव उदापुरे (६०)
विजय पाटनकर (४०)
नितीन साठे (४१)
सचिन डोळस (४५)
बाबर (५५, शिपाई)
पोलिसांनी हेनरीला मुंबईतून अटक केली असून, उर्वरित सहा आरोपी अद्याप फरार आहेत.
मंत्रालयातील “आतील हात” असल्याचा संशय
मंत्रालयात आरोपींनी सहज प्रवेश मिळवून स्वतःचे कॅबिन तयार करणे, नावाची पाटी लावणे आणि मुलाखती घेणे हा प्रकार मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नाही, असा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
शेकडोंच्या फसवणुकीची शक्यता
या रॅकेटने महाराष्ट्रभरातील किमान २०० हून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा पोलिस ठाण्यांत चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पुढील चौकशीत आणखी मोठ्या प्रमाणावर फसवणूक समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल तायडे यांची मागणी
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल तायडे यांनी फरार आरोपींना त्वरित अटक करावी व मंत्रालयातील सुरक्षा त्रुटींवर चौकशी करावी, अशी मागणी केली.