लग्नाआधी शरीरसंबंधास नकार दिल्याने तरुणीवर बलात्कार करून खून; पालघरमध्ये संतापजनक घटना
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर -पालघर जिल्ह्यातील बिबलधर गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे संतापाच्या भरात तरुणीवर प्रथम लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा गळा दाबून खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबलधर गावातील २२ वर्षीय तरुणीचे लग्न कुटुंबीयांच्या संमतीने एका तरुणाशी ठरले होते. घटनेच्या दिवशी पीडितेचे आई-वडील शेतात गेले असता ती घरी एकटी होती. याच संधीचा फायदा घेत तिचा होणारा नवरा घरी आला. त्याने पीडितेला लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, पीडित तरुणीने यास ठाम नकार दिला.
या नकारामुळे संतापलेल्या आरोपीने जबरदस्ती तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केला.
यानंतर आरोपी गावाजवळील जंगलात पळून गेला. संध्याकाळी मुलीचे आई-वडील घरी परतल्यावर त्यांनी आपल्या मुलीचा मृतदेह पाहून पोलिसांना धाव घेतली. पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे आणि शोककळा पसरल्या आहेत.