नाना पेठेत गँगवॉर! आंदेकर टोळीवर खुनाचा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, त्यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद उर्फ आयुष (वय १८) याची बेछूट गोळीबार करून हत्या करण्यात आली. हा थरारक प्रकार शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत घडला. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (रा. लक्ष्मी काॅम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून डोळ्यादेखत पिस्तुलातून सलग गोळ्या झाडून करण्यात आला.
या प्रकरणी बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष दुचाकीवरून लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर गाडी लावत असताना आरोपी अमन खान आणि यश पाटील सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. त्यांनी आयुषवर बेछूट गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. हा कट बंडूअण्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबार व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह तब्बल १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयुष कोमकरची हत्या सूडभावनेतून करण्यात आल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे करीत आहेत.