विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला; भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
योगेश पांडे / वार्ताहर
भाईंदर – मुंबईतील भाईंदर गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता प्रतीक शाह (३४) याचा वीजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या जल्लोषात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीसाठी झाडांवर आणि इमारतींवर रोषणाईची सोय करण्यात आली होती. विद्युत केबल्स टाकून प्रकाशयोजना केली गेली होती. रात्री साडेसात ते पावणे आठच्या सुमारास गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना प्रतीक शाह यांना वीजेचा धक्का बसला. काही सेकंदांतच त्यांनी प्राण सोडले.
प्रतीक शाह यांच्यासोबत असलेला दुसरा कार्यकर्ता त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, त्यालाही वीजेचा जोरदार धक्का बसला. सुदैवाने, उपस्थितांनी प्रसंगावधान राखत तातडीने बांबूचा वापर करून त्याला सुरक्षित बाजूला खेचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु प्रतीक शाह यांना मात्र वाचवता आले नाही.मृत प्रतीक शाह हे भाईंदर पश्चिमेतील वसंत वैभव इमारतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील लोकांनीही या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.