ठाण्यात बेकायदेशीर देशी पिस्तूलसह इसम अटक – कासारवडवली पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत कासारवडवली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका इसमाला देशी बनावटीच्या पिस्तूलसह ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. १ सप्टेंबर रोजी रात्री १०.५५ वाजता नागलाबंदर सिग्नल, घोडबंदर रोड येथे पोलिसांनी सापळा रचला. खात्रीशीर माहितीच्या आधारे तेथे आलेल्या नोगिन्दर लछीराम राजभर (२७, राहणार कासारवडवली, मूळ गाझीपुर, उत्तरप्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेतून एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ६५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे शस्त्र परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी आरोपीविरोधात गु. र. नं. ८१९/२०२५ भादंवि कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकात सपोनि मनिष पोटे, पो.उपनिरीक्षक नितीन हांगे, श्रे.पो.उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी तसेच अंमलदार जगदीश पवार, जयसिंग राजपूत, गोरक्षनाथ काळे, संदीप तुपे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि मनिष पोटे करत आहेत.