ठाण्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणासाठी ७ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शांततेत सण पार पडावेत यासाठी पोलिसांकडून व्यापक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची तगडी फौज
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका तसेच ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये मोठी गर्दी होत असते. गर्दीचा फायदा घेत चोरी, चैन/मोबाईल स्नॅचिंग, पर्स व बॅग चोरण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच मोटार वाहन चोरी रोखण्यासाठीही उपाययोजना केल्या आहेत.
साध्या वेशातील पोलिसांची पथके
विशेष शाखा व गुन्हे शाखेतील पुरुष व महिला पोलिस अंमलदार साध्या वेशात मैदानात तैनात राहणार आहेत. धार्मिक भावना दुखावून शांतताभंग घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांचे काटेकोर लक्ष राहणार आहे.
सोशल मीडियावर नजर
सणासुदीच्या काळात काही समाजकंटक सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओ टाकतात. अशांवर त्वरित कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाचा सोशल मीडिया सेल सतर्क ठेवण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारची कोणतीही माहिती आढळल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
सण शांततेत पार पाडण्यासाठी खालील प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे :
उप आयुक्त : ११
सहाय्यक पोलीस आयुक्त : २६
पोलिस निरीक्षक : १००
पोलीस अधिकारी व अंमलदार : ७,००० हून अधिक
मुंबई येथून पोलीस निरीक्षक : १०
सहाय्यक पोलीस निरीक्षक : ५
मुंबई लोहमार्ग पोलिस : ५०
होमगार्ड : ८००
एस.आर.पी.एफ. : २ कंपन्या
याशिवाय ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे.
पोलिसांचे आवाहन
“गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण सर्वांनी शांततेत व आनंदात साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था राखणे ही फक्त पोलिसांचीच नव्हे तर नागरिकांचीही जबाबदारी आहे,” असे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.