पथ्रोटमध्ये धक्कादायक खून : पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा केला खून
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीत काल रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. पतीच्या आड येणाऱ्या अनैतिक संबंधांचा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृताचे नाव अरविंद सुरतणे (वय ३७) असे असून, तो पथ्रोटमधील झेडा चौकात बाभुळकर यांच्या घरात भाड्याने राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदची पत्नी शेजारील अमित लवकुश मिश्रा (वय ३३) याच्या घरी स्वयंपाकासाठी नेहमी जात असे. या कारणामुळे दोघांमध्ये ओळख वाढली आणि ती हळूहळू अनैतिक संबंधांमध्ये परिवर्तित झाली.
याबाबत संशय आल्याने अरविंदने या संबंधांना विरोध दर्शविला. त्यानंतर संतापाच्या भरात पत्नी जोशना अरविंद सुरतणे हिने प्रियकर अमित मिश्रा याच्या मदतीने पतीचा खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी अमित मिश्रा थेट पथ्रोट पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच्यासह मृताची पत्नी जोशनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन पुंडते करत आहेत. या खुनामुळे पथ्रोटसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.