ठाण्यात तिवारी सदन इमारतीचा स्लॅब कोसळला; खबरदारी म्हणून १७ रहिवाशांना स्थलांतर

Spread the love

ठाण्यात तिवारी सदन इमारतीचा स्लॅब कोसळला; खबरदारी म्हणून १७ रहिवाशांना स्थलांतर

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : किसन नगर क्र. २ येथील मस्जिद गल्लीमध्ये असलेल्या तिवारी सदन या जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र खबरदारी म्हणून ठाणे महानगरपालिकेने तातडीने संपूर्ण इमारत रिकामी करून १७ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळमजला अधिक तीन मजली असलेली तिवारी सदन इमारत सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेली असून, सी २ बी प्रवर्गातील धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. सध्या या इमारतीत संरचनात्मक दुरुस्तीचे काम सुरू आहे. याच इमारतीतील रीता प्रकाश उपाध्याय यांच्या मालकीच्या रूम क्रमांक ६ या खोलीचा स्लॅब दुपारी कोसळला.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ कार्यवाही करत संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीतील १७ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिसराला धोकापट्टी पट्टे लावून बॅरिगेटिंग केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon