मराठा आंदोलनाला वेग; मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी मुदतवाढ, मुंबईत वाढल्या हालचाली
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. आझाद मैदानावर आज सकाळपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून, या उपोषणाला मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
केवळ एका दिवसाची परवानगी, अखेर वाढवली मुदत
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला २९ ऑगस्टच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच उपोषण करण्याची परवानगी दिली होती. मात्र, मराठा समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे आणि शिस्तबद्ध आंदोलनामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अखेर प्रशासनाने आंदोलकांची मागणी मान्य करत आणखी एका दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना उद्या संध्याकाळपर्यंत आझाद मैदानावर उपोषण सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.
मुंबईत आंदोलकांची शिस्तबद्ध उपस्थिती
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे. पावसाचा फटका बसत असला तरी आंदोलकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन सुरू ठेवलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकात आसरा घेतला. पोलिसांनीही त्यांना सहकार्य केलं असून, संपूर्ण यंत्रणा सावध आहे.
राजकीय हालचालींना वेग
या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीहून तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या आंदोलनाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत.
“मराठा आता थांबणार नाही” – जरांगे ठाम
“मराठा आता थांबणार नाही,” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाचा निर्धार स्पष्ट केला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून लढा दिला जात आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेलं हे उपोषण मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण देणार आहे. पुढील काही तासांत या आंदोलनावरून मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.