मुलीच्या वाढदिवशीच पत्त्यासारखी कोसळली इमारत; आईचा मृत्यू, ३२ तासांपासून वडील बेपत्ता. शोधकार्य सुरुच
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – विरार पूर्वेच्या विजयनगर इथल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळून मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेच्या ३२ तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ओंकार जोविल यांचं सर्वच कुटुंब उध्वस्त झालं आहे. २६ ऑगस्ट रोजी ओंकार यांच्या एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस होता. रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत त्यांच्या घरात वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. नातेवाईक, मित्र परिवार तिथे जमले होते आणि सेलिब्रेशननंतर रात्री अकराच्या सुमारास ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री पावणे बारा वाजरा अचानक काळाने घाला घातला. रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत चिमुकली उत्कर्षा आणि तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील ओंकार अद्याप बेपत्ता आहेत. १० ते १२ वर्षे जुनी असलेल्या या चार मजली इमारतीच्या मलब्याखाली २५ ते २६ जण अडकले होते. त्यापैकी अनेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत २४ जणांना मलब्याखालून बाहेर काढलंय. तर १५ जणांचे मृतदेह आढळले आहेत. इमारतीतील दोन बेपत्ता रहिवाशांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेच्या ३२ तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आणखी दोन मृतदेह इमारतीच्या मलब्याखाली असण्याची शक्यता आहे. तर ९ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तात्काळ बचावासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या, पालिकेचं अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून परिसरातील चाळींचं बांधकाम तोडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
रमाबाई अपार्टमेंट इमारतीतील इतरांना तिथून तातडीने बाहेर काढण्यात आलं आहे. ही इमारत खाली करण्यात आली आहे. ही अनधिकृत इमारत पाडली जाणार आहे. तिथून नागरिकांचं सामान बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्घटनेमुळे अनेकांना बेघर व्हावं लागलं आहे. दुर्घटनेत बचावलेल्यांची नावं-
प्रभाकर शिंदे (५७),प्रमिला प्रभाकर शिंदे (५०),प्रेरणा शिंदे (२०),प्रदीप कदम (४०),जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८),संजय सिंग (२४),मंथन शिंदे (१९),विशाखा जोविल (२४).
मृतांची नावं-
आरोही ओंकार जोविल (२४),
उत्कर्षा जोविल (१),लक्ष्मण किसकू सिंग (२६),दिनेश प्रकाश सकपाळ (४३),सुप्रिया निवळकर (३८) आणि
अर्णव निवळकर (११).