सप्तर्षी सोसायटी समिती बरखास्त; पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र
रवि निषाद / मुंबई
मुंबई – कुर्ला येथील सप्तर्षी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या विद्यमान समितीवर अखेर उपनिबंधकांनी कारवाई करत समिती बरखास्त केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७५(५), ७७(अ) व ८२(४) च्या उल्लंघनाबाबत ही कारवाई करण्यात आली असून, समिती सदस्यांना पुढील पाच वर्षांकरिता निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यासही अपात्र ठरविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या एजीएम बैठकीत अनेक अनियमितता आढळल्या होत्या. ही एजीएम अर्धवट सोडून देणारे तसेच उपनिबंधकांकडे राजीनामा देऊ असे सांगणारे समिती सदस्य आता पदावरून हटविले गेले आहेत. गतवर्षी झालेल्या एजीएममध्ये जमा असलेली रक्कम सभासदांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र समितीने त्याला विरोध केला. त्यानंतर जवळजवळ ११ महिन्यांनी भीतीपोटी पैसे वाटप करण्यात आले, असे अनेक सभासदांचे म्हणणे आहे. पैसे वाटप करताना विविध प्रकारचे फॉर्म तयार करण्यात आले, त्यामध्ये संमतीपत्राचाही समावेश होता. विरोध झाल्यानंतर संमतीपत्र रद्द करण्यात आले, परंतु चेक देताना सर्वांकडून पोचपावती सही करून घेण्यात आली. ही पोचपावती सोसायटीच्या लेटरहेडवर व रेव्हेन्यू स्टॅम्पसह घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
समितीने कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः बिल्डरकडून २५ लाखांचा क्लेम मागविण्याच्या निर्णयावर सभासदांनी आक्षेप घेतला होता. अशी हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या समितीचा अखेर पाय उतार झाला आहे. सध्या अपात्रतेचा निर्णय जाहीर झाला असून, पुढे आणखीही काही निर्णय येण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर सोसायटीमध्ये नव्या समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.