इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणे तरुणाला पडले जीवावर; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
नालासोपारा : सोशल मीडियामुळे कुणाशीही कधीही संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. परंतु याचे दुष्परिणामही वारंवार दिसून येतात. अशाच एका घटनेत नालासोपाऱ्यात इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवण्याच्या कारणावरून एका तरुणाचा जीव गेला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यात प्रतिक वाघे नावाच्या तरुणाने एका तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. हा मेसेज त्या तरुणीच्या प्रियकराला – भूषण पाटीलला – मान्य झाला नाही. त्याने या प्रकरणाचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला व आपल्या मित्रांना सोबत घेऊन प्रतिकला गाठले.
घटना मोरेगाव तलावाजवळ घडली. प्रतिक तिकडून जात असताना भूषण पाटील व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. सुरुवातीला वाद घालण्यात आला व त्यानंतर थेट प्रतिकला बेदम मारहाण करण्यास सुरुवात झाली. भूषणसह त्याचे मित्र प्रतिकवर तुटून पडले. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओही आरोपींनी तयार केला होता. मारहाणीत प्रतिक गंभीर जखमी झाला. आरोपी त्याला तिथेच टाकून पसार झाले. काही स्थानिकांना प्रतिक रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र मारहाण इतकी भीषण होती की प्रतिकची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत. ही घटना सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकते. केवळ मेसेज पाठवण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा बळी जावा, हे समाजासाठी गंभीर धोक्याचे संकेत आहेत.