लँड माफियाला मदत केल्याचा आरोप; वसईतील ‘दबंग’ पोलीस उपनिरीक्षक राणे निलंबित, वरिष्ठांवरही संशयाची सुई
योगेश पांडे / वार्ताहर
वसई-पूर्व येथील वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना अखेर मोठा धक्का बसला आहे. पदाचा गैरवापर करून स्थानिक लँड माफिया सुशील जैन याला मदत केल्याप्रकरणी राणे यांना पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
जमिनीवर दबंगगिरी; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
फिर्यादी दीपक गामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हा वाद मूळतः दिवाणी स्वरूपाचा होता. तरीदेखील पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धडक मारली, सुरक्षारक्षकांना धमकावले आणि गामी यांच्या जमिनीचे पझेशन लँड माफिया जैनकडे दिले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, पुराव्यानिशी तक्रार दाखल होताच तात्काळ निलंबन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग?
फिर्यादीचे वकील भास्कर झा यांनी या प्रकरणात फक्त पोलीस उपनिरीक्षक राणे नव्हे, तर आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आगामी चौकशीत आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बनावट मार्कशीट रॅकेटमध्येही नाव
यापूर्वी वसईत उघड झालेल्या बनावट मार्कशीट रॅकेटमध्येही पोलीस उपनिरीक्षक राणे यांचे नाव समोर आले होते. अवघ्या ६५ हजार रुपयांत तीन महिन्यांत कोणतीही पदवी उपलब्ध करून देणाऱ्या या रॅकेटमध्ये शिक्षण माफिया, काही विद्यापीठे आणि खासगी संस्थांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्नी रावल यांनी या प्रकरणात राणे यांनी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, त्यांच्याकडून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे लेखी निवेदन पोलीस आयुक्तांना दिले आहे.
‘वरदहस्तामुळेच दबंगगिरी’ – स्थानिकांची चर्चा
राणे यांच्याविरोधात आधीपासून अनेक गंभीर तक्रारी असूनही, वरिष्ठांचा वरदहस्त असल्यानेच त्यांनी इतकी मजल मारली, अशी चर्चा स्थानिकांत रंगली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वसईतील ‘दबंग’ पोलीस उपनिरीक्षक राणे यांच्या निलंबनानंतर पोलिस खात्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.