उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; ३२ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, एक जण अटक
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत उल्हासनगर गुन्हे अन्वेषण पथकाने तब्बल ₹३२ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचे १६१ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अंबरनाथ पूर्व पालेगाव, दर्गा परिसरात सापळा रचून करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत एका इसमाकडे एमडी ड्रग्स असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याची अंगझडती घेतली असता १६१ ग्रॅम एमडी ड्रग्स तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव फरहान हबीब चौधरी (रा. मानखुर्द, मुंबई) असे असून, तो अंमली पदार्थ विक्रीसाठी अंबरनाथ येथे आला होता. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल ₹३२ लाख ३० हजार ४०० रुपये एवढी आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या रॅकेटमधील दुसरा आरोपी अहमद कुरेशी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सावंत, गणेश गावडे, योगेश वाघ, रितेश वंजारी, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, अविनाश पवार यांनी सहभाग घेतला. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.