मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल मोठी अपडेट, ‘या’ वर्षी निवडणुका नाहीच!
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका या जानेवारीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुका या वर्षी न होता पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका अधिसूचित करून घेण्याचे आणि आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सूचना हरकतीनंतर ६ ऑक्टोबर रोजी प्रारुप आराखडा अंतीम होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला नवा महापौर जानेवरीत मिळण्याची शक्यता आहे.
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. २०१७ च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास जैसे थे ठेवण्यात आली आहे. कोस्टल रोड, मेट्रो सारख्या विकासकामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले आहे. वॉर्डातील लोकसंख्यावाढीचा प्रभाग रचनेवर परिणाम नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत.२०२० पासून राज्यात अनेक वेळा निवडणुकांची तयारी झाली असली तरी, त्या प्रत्यक्ष झाल्या नाहीत. जानेवारी महिन्याच्या मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे.