वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही; तुळजापुरातील ६ हजार बोगस मतदारांबाबत खासदार ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “वेळेत तक्रार करूनही कारवाई झाली नाही, मग निवडणुकीची पारदर्शकता कुठे राहिली?” असा थेट सवाल निंबाळकर यांनी निवडणूक आयुक्तांकडे केला आहे.
निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर
ओमराजेंच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता तुळजापूरातील ६ हजार बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी चावडी वाचनादरम्यान संशयास्पद अर्ज समोर आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी ते अर्ज बाद केले होते, मात्र या संदर्भात पोलिसांत दाखल गुन्ह्याचा तपास शून्यावर असल्याची खंत खासदारांनी व्यक्त केली.
भाजप आमदारावर थेट आरोप
या प्रकरणाशी तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या मुंबईतील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा संबंध असल्याचा थेट आरोप ओमराजेंनी केला. “या बोगस मतदारांमध्ये तेरणा कॉलेजसह काही अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे आमच्या तपासात समोर आले. हे प्रकार निवडणुकीपूर्वी हेतुपुरस्सर केले गेले. पोलिसांनी अजून तपासच केला नाही. मग न्याय कसा मिळणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“तक्रार वेळेत केली, मग कारवाई का नाही?”
ओमराजेंनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची तक्रार नऊ महिन्यांपूर्वी तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनीच केली होती. “आयोगाकडे व पोलिसांकडे सर्व पुरावे असूनही कारवाई केली नाही. आयोग म्हणतो वेळेत तक्रार नाही, पण प्रत्यक्षात वेळेत तक्रार झाली आहे. मग तपास का थांबवला गेला? कोणाच्या दडपणाखाली प्रशासन आहे?” असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींना टॅग करत माहिती दिली
दरम्यान, खासदार ओमराजेंनी या प्रकरणाची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही ट्विटद्वारे दिली असून कागदपत्रे सोपविण्याचं जाहीर केलं आहे. “राहुल गांधी जे आरोप देशभरात करतात, ते तुळजापूरच्या प्रकरणाने खरे ठरत आहेत. पाठीशी कोण आहे हे जनतेला माहीत आहे. पण निवडणूक प्रक्रियेत जनतेचा विश्वास ढळू नये, म्हणून आम्ही न्याय मिळवणारच,” असे ते म्हणाले.
पुढील दिशा?
तुळजापुरातील ६ हजार बोगस मतदार प्रकरणामुळे निवडणुकीतील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल मागवल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी गती घेते का, की पुन्हा फाइल दडपली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.