दीड वर्ष फरार राहिलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपीला माटुंगा पोलिसांची गजाआड
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : तब्बल दीड वर्ष पोलिसांना चकवून फरारी जीवन जगणाऱ्या दरोड्यातील मुख्य आरोपीस अखेर माटुंगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोन्याचे तब्बल ३५ किलो कास्टिंग गोल्ड आणि गोल्ड डस्ट हिसकावून नेणाऱ्या या गुन्ह्यातील सराईत आरोपी निलेश अखिलेश श्रीवास्तव (वय ३२, रा. टिटवाळा) यास पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे सव्वा बारा वाजता फिर्यादी बलराम कुमार सिंग आणि त्यांचे सहकारी हे दादर स्टेशनहून टॅक्सीने लोअर परळकडे जात होते. रामी हॉटेलसमोर पोहोचताच अनोळखी इसमांनी टॅक्सी अडवून त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील लाल रंगाची बॅग जबरदस्ती हिसकावून आरोपी पसार झाले. त्या बॅगेत ३५ किलो कास्टिंग गोल्ड आणि गोल्ड डस्ट (किंमत सुमारे ₹२७ लाख) इतका मुद्देमाल होता. या घटनेवरून माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३८/२०२३ भादंवि कलम ३९५, ३४१, ३४७, ३२३, ५०४, १२०(बी) नुसार नोंदवण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली तसेच तांत्रिक तपासाचा वापर करून अवघ्या तीन दिवसांत आरोपींचा मागोवा लावला होता. आतापर्यंत सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ₹२ लाख रोख, १२६.२ ग्रॅम सोनं, ६ किलो १०० ग्रॅम कास्टिंग गोल्ड व फायलिंग डस्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मुख्य आरोपी निलेश श्रीवास्तव हा गुन्ह्यानंतर मागील दीड वर्षापासून फरार होता. पोलिसांना चकवण्यासाठी त्याने मोबाईल फोन बंद ठेवला, दाढी वाढवून आपला गेटअप बदलला तसेच उत्तर भारतातील विविध ठिकाणी वास्तव्य केले. मात्र पोलिसांनी त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली होती. अखेर गोपनीय बातमीदारांच्या मदतीने व तांत्रिक तपासातून त्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) विक्रम देशमाने, परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. केशव वाघ, पो.उपनि. संतोष माळी, पो.शि. देवेंद्र बहादुरे, प्रवीण तोडासे व किशोर देशमाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. माटुंगा पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे दीड वर्ष जुना सोन्याच्या दरोड्याचा गुन्हा उकलला असून फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या अटकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.