चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू; परिसरात ५ ते ६ फूट पाणी

Spread the love

चक्क रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू; परिसरात ५ ते ६ फूट पाणी

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे शहर व उपनगरात मोठी पडझड झाली आहे. वसई पश्चिमेतील विशालनगर परिसरात साचलेल्या पाण्यात पडून ६० वर्षीय लिलाबाई रोहम या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे परिसरात पाच ते सहा फूट पाणी साचले असून नागरिकांचे हाल कायम आहेत. लिलाबाई रोहम या विशालनगर येथील भगवती अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होत्या.मंगळवारी दुपारी आपल्या घरात असताना परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले होते. या पाण्यात चालताना त्या अचानक घसरून पडल्या. लगेचच शेजारील लोकांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. परिस्थिती इतकी बिकट होती की लिलाबाई यांना सरळ रुग्णालयात घेऊन जाणे शक्य नव्हते. पाण्यामुळे वाहनांची हालचाल ठप्प झाल्याने नागरिकांनी त्यांना खुर्चीत बसवून अर्धा किलोमीटर अंतरावरील पंचवटी नाक्यापर्यंत आणले. पंचवटी नाक्यावरून १०८ क्रमांकाच्या ॲम्बुलन्सद्वारे त्यांना वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे विशाल नगर परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “विशाल नगर परिसर आजही पाच ते सहा फूट पाण्याखाली असून नागरिकांचे हाल सुरूच आहेत. रस्ते, घरे आणि संपूर्ण वसाहतीत पाणी शिरल्याने लोकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांना बाहेर पडणे, अन्नधान्य व औषधांची सोय करणे कठीण बनले आहे.” सध्या परिसरात अजूनही पाणी ओसरण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही घरांमध्ये पाच फूटांपेक्षा अधिक पाणी असल्याने लोकांना घराबाहेर काढावे लागत आहे. वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon