ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
बोईसर – डहाणू तालुक्यातील सायवन ग्रामपंचायतीत ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून त्यापैकी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेविका आणि कंत्राटी लिपिक यांच्या विरोधात कासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरपंच विष्णू बोरसा आणि कंत्राटी लिपिक यशवंत भोये यांना ताब्यात घेण्यात आले असून ग्रामसेविका ममता पिंपळे यांची चौकशी करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
तक्रारदार हे स्थानिक लोकांकडून गवत खरेदी करून डहाणू परिसरातील तबेला, गोठे व पेपर कंपन्यांना पुरवठा करतात. या कामासाठी त्यांनी सायवन ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. मात्र ग्रामसेविका ममता पिंपळे आणि सरपंच विष्णू बोरसा यांनी या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने १३ ऑगस्ट रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाच मागणीची खात्री झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ग्रामसेविका व सरपंच यांच्या सांगण्यावरून कंत्राटी लिपिक यशवंत भोये याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणी सरपंच विष्णू बोरसा, ग्रामसेविका ममता पिंपळे आणि कंत्राटी लिपिक यशवंत भोये यांच्याविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामसेविका ममता पिंपळे यांना कलम ३५ (३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे, हवालदार रुपेश पाटील, सुनील पवार आणि विजया सुरवाडे यांनी केली.