शेअर बाजारातील नुकसानीतून चोरीचा कट, उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा

Spread the love

शेअर बाजारातील नुकसानीतून चोरीचा कट, उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा

योगेश पांडे / वार्ताहर 

नालासोपारा – रक्षाबंधनाचा सण साजरा झाल्यानंतर वसईमध्ये एक चोरीची घटना उघडकीस आली आहे, जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. पुरुषाचा वेष धारण करून आणि एक अचूक योजना आखून एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. मात्र, वसई-विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही महिला चोर केवळ १२ तासांतच पकडली गेली. आरोपीचे नाव ज्योती भानुशाली (२७) असून, ती उच्चशिक्षित असून बँकेत नोकरी करते. शेअर बाजारात लाखोंचे नुकसान झाल्यामुळे ज्योती भानुशालीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे. तिने थेट आपल्या बहिणीच्या श्रीमंत सासऱ्यांच्या घरावर डोळा ठेवला. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला आधीच माहिती होती. त्यामुळे, तिने संपूर्ण घटनेचा व्यवस्थित कट रचला.

ही घटना रविवारी सकाळी घडली, जेव्हा रक्षाबंधनानिमित्त कुटुंबीय बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत ज्योतीने पुरुषाचा वेष धारण केला आणि शास्त्री नगरातील ओधवजी भानुशाली यांच्या घरी प्रवेश केला. सुरुवातीला भाड्याने फ्लॅट मिळेल का अशी विचारणा केली. त्यानंतर पाणी पिण्यासाठी मागितले आणि मग “बाथरूमची भिंत गळत आहे” असे सांगून ओधवजी भानुशाली यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले. यानंतर क्षणाचाही विलंब न करता तिने घरातून दीड कोटी रुपयांचे दागिने असलेल्या दोन बॅगा लंपास केल्या आणि पसार झाली. रात्री मुलगा व सून घरी परतल्यावरच वृद्ध भानुशाली यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ माणिकपूर पोलिसांत दरोड्याची तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना चोरीचा माल घेऊन जाणारी एक महिला दिसली. तिचा चेहरा स्कार्फने झाकलेला होता, पण पोलिसांना तो स्कार्फ ओळखून आला. तो स्कार्फ भानुशाली यांच्या सुनेच्या बहिणीचा होता. या धाग्याचा आधार घेत पोलिसांनी पुढील तपास केला आणि काही तासांतच नवसारी येथून ज्योती भानुशालीला अटक केली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ज्योतीला पकडले आणि तिच्याकडून चोरीचा माल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon