छेडा नगरात पुन्हा सुरू झाले लॉजिंग व्यवसाय; पोलीस व मनपा अधिकार्‍यांवर संगनमताचे आरोप

Spread the love

छेडा नगरात पुन्हा सुरू झाले लॉजिंग व्यवसाय; पोलीस व मनपा अधिकार्‍यांवर संगनमताचे आरोप

पोलीस महानगर नेटवर्क 

चेंबूर : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या छेड़ा नगर परिसरातील बंद करण्यात आलेली लॉजिंग- बोर्डिंग आस्थापने पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिस व मनपा अधिकार्‍यांवर संगनमताचे गंभीर आरोप होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२५ रोजी मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एमओएच) आणि टिळक नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे दोन डझन लॉजिंग- बोर्डिंग बंद केले होते. त्यावेळी या आस्थापनातील साहित्यही जप्त करण्यात आले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ही लॉजिंग हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागली आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सफलता लॉजिंग’, ‘आश्रय लॉजिंग’, ‘समृद्धी लॉजिंग’ यांसह काही आस्थापने दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झाली असून, यामागे कथित लॉजिंग माफिया दिवाकर प्रजापती व कार्तिक नाडार यांचा हात असल्याचा आरोप आहे. या सर्व कामकाजाला टिळक नगर पोलिस आणि मनपाच्या हेल्थ व लायसन्स विभागातील काही अधिकार्‍यांची मौन संमती मिळाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक समाजसेविका सौ. अनीता पाटोळे यांनी या संदर्भात लेखी तक्रार देऊन संबंधित विभागांना प्रश्न विचारला आहे की, कोणाच्या आदेशानुसार ही लॉजिंग पुन्हा सुरू झाली. नागरिकांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात काही स्थानिक जनप्रतिनिधीही सहभागी झाले असून, त्यांनी लॉजिंग मालकांकडून लाभ घेऊन मौन स्वीकृती दिली आहे. त्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. तपास चुकवण्यासाठी काही लॉजिंग मालकांनी आपल्या आस्थापनांवर ‘गॅरेज’ किंवा इतर नावाचे फलक लावले आहेत, परंतु प्रत्यक्षात आतील कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ कारवाई करून हा बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon