कबुतरखाना प्रकरण तापणार! जैन समाजाचा १३ तारखेपासून उपोषणाचा इशारा; गरज पडल्यास हातात शस्त्र घेण्याची तयारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – उच्च न्यायालयाने कबुतरखान्याच्या आसपास कबुतरांना खाद्य टाकण्यावर घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाज अधिक आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही जैन समाजातील काही व्यक्तींनी दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांना अन्न टाकले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यांना थांबवले. यामुळे समाजाने १३ तारखेपासून कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत ‘गरज पडल्यास हातात शस्त्र घेऊ’ असे म्हटले आहे. निलेशचंद्र विजय कबुतरखान्याबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह आणि उपोषण करू. जैन समाज शांतताप्रिय आहे आणि शस्त्र उचलणे आमचे काम नाही, पण गरज पडली तर धर्माच्या रक्षणासाठी आम्ही शस्त्रही हाती घेऊ शकतो. आम्ही भारताचं संविधान मानतो ना, कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही.
हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि कबुतरं मरता कामा नयेत. सरकारच्या आदेशानंतर पक्ष्यांना खाद्य देणे सुरू झाले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हा सगळा प्रकार सुरु आहे. आमचं पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही. १३ तारखेला आम्ही उपोषण सुरु करु. देशभरातली जैन बांधव आंदोलनासाठी इथे येतील. जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातली १० लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला. दारू आणि कोंबड्या खाऊन किती लोक मरतात, हेही दाखवावे. आम्ही पालिकेकडे कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिलं आहे, असेही जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावर आता मनसे आणि ठाकरे गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.