मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका परिसरात सिमेंट मिक्सर उलटल्याने भीषण वाहतूक कोंडी

Spread the love

मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका परिसरात सिमेंट मिक्सर उलटल्याने भीषण वाहतूक कोंडी

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात रविवारी सकाळी सिमेंट मिक्सर वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन दुभाजकावर धडकून उलटले. या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातग्रस्त वाहनात १५ टन सिमेंट काँक्रीट भरलेले होते. त्याशिवाय रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अंजुरगाव येथून घोडबंदरच्या दिशेने सिमेंट मिक्सर वाहन रविवारी सकाळी जात असताना, सुमारे ११ वाजता खारेगाव टोलनाका परिसरात आले असता चालक अरविंद गुप्ता याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन महामार्गाच्या दुभाजकावर आदळून उलटल्याने मोठा अपघात घडला. अपघातानंतर वाहतूक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली.

क्रेनच्या साहाय्याने उलटलेले वाहन रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले. मात्र, अपघातामुळे खारेगाव टोलनाका व खारेगाव खाडी पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली. भिवंडी, नाशिकवरून ठाणे, मुंबई व नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना तासन्‌तास कोंडीत अडकावे लागले. रस्त्यावर पसरलेल्या तेल आणि इंधनामुळे घसरटपणा निर्माण झाला होता. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाने घटनास्थळी माती पसरून रस्ता सुरक्षित केला. त्यानंतर मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या अपघातामुळे रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रस्त्यावर निर्माण झालेली कोंडी आणि विलंबामुळे प्रवाशांचे हाल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon