नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआय कडून भांडाफोड; पाच जण अटक

Spread the love

नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआय कडून भांडाफोड; पाच जण अटक

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – केंद्रीय अन्वेषण संस्था (सीबीआय) ने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सीबीआय ने मुंबईतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात उघडकीस आले की हे कॉल सेंटर स्वतःला ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनचे ग्राहक मदत केंद्र असल्याचे भासवत होते. येथून परदेशातील नागरिकांना, विशेषतः अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील लोकांना, गिफ्ट कार्ड व क्रिप्टोकरन्सी संदर्भात फसवणुकीचे कॉल केले जात होते. या माध्यमातून आरोपींनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली.

सीबीआय च्या मते, आरोपींनी या कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी सुमारे ६० जणांची नेमणूक केली होती. छाप्यादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी ४४ लॅपटॉप, ७१ मोबाईल फोन, महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करत असून, आरोपींच्या संपर्कातील इतर गुन्हेगारांची माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या रॅकेटमधून करोडो रुपयांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती वाढवण्याची आणि नागरिकांनी परदेशी नंबरवरून येणाऱ्या संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon