वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृति; सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृति; सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – वैष्णवी हगवणे प्रकरणाची जखम अजून ताजी असतानाच, पुण्यात आणखी एक नवविवाहित महिला सासरच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्नेहा झेंडगे या २५ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी २० लाख रुपये देण्याच्या दबावामुळे, घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू, दिर, नणंद, नणंदेचा पती आणि सासऱ्यांचे साडू अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी स्नेहाचा पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दिर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींनी संगणमत करून स्नेहावर विवाहानंतर सतत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचा विवाह मे २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर ९ ऑगस्ट २०२५ रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर मयत स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४९८अ, ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon