मनसे कार्यकर्त्यांकडून येस बँक अधिकाऱ्याला मारहाण; वाहन जप्तीवरून नागपुरात तणाव

Spread the love

मनसे कार्यकर्त्यांकडून येस बँक अधिकाऱ्याला मारहाण; वाहन जप्तीवरून नागपुरात तणाव

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर : नागपुरातील सदर परिसरातील माऊंट रोड येथील येस बँकेच्या शाखेत मंगळवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बँकेच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई मनसेच्या नागपूर शहराध्यक्ष चदु लाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. येस बँकेच्या कर्जवसुली विभागातील मनमानी कारभाराच्या विरोधात सुमारे ४०-५० कार्यकर्ते सदर परिसरातील येस बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर जमले. बँकेने आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन शटर आधीच बंद केले होते. मात्र, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बँकेच्या अन्य कार्यालयाकडे कूच केली.

पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आंदोलकांनी चौथ्या मजल्यावरील बँकेच्या लोन विभागातील अधिकाऱ्याचा शोध घेतला आणि त्याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत अधिकाऱ्याला घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर काढले. या आंदोलनामागील पार्श्वभूमी अशी की, ग्राहक इंद्रजित मुळे यांनी येस बँकेतून कर्ज घेऊन व्यवसायासाठी जेसीबी खरेदी केली होती. काही काळ हप्ते वेळेवर भरल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे हप्ते थकले. त्यानंतर बँकेने जुन्या तारखेला नोटीस पाठवून वाहन जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

इंद्रजित मुळे यांच्या म्हणण्यानुसार, वाहन अद्याप येस बँकेच्या यार्डमध्ये उभे असून, बँकेचे अधिकारी ते विकले गेल्याचे खोटे सांगत आहेत. काही विक्रेत्यांशी संगनमत करून ग्राहकाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यांनी तातडीने योग्य कारवाई करून वाहन ग्राहकाकडे परत देण्याची मागणी केली, अन्यथा बँकेविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon